Saturday, July 7, 2018

कीटकनाशके आणि सेंद्रिय शेती




कीटकनाशके आणि सेंद्रिय शेती

एकही खर्च न करता, 4000 शेतकऱ्यानी पिकावर येणारी कीड 5 प्रकारच्या वनस्पतींचा वापर करून घालवली. हा व्हिडीओ पाहिला. हा व्हिडीओ पहाताना दोन वाक्यप्रचार आठवले. तुझं आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी. आणि लोहा लोहेको काटता है।

निसर्गाने सर्व काही आपणास दिले आहे परंतु मल्टिनॅशनल कंपन्यांनी चुकीची दिशा सर्व बाबतीत आपणास दाखवली. आणि आतापर्यंतच्या सरकारने त्याला मान डोलावली... पैशाचा पाऊस जो पडत होता. अनेक कीटकनाशके जी युरोपियन देशात बँड होती ती आपल्याकडे सर्रास विकली जात होती. ही कीटकनाशके फवारल्याने पिकामधून ही आमच्या आणि जनावरांच्या पोटात गेली. ही मेलेली जनावरे खाऊन गिधाडे नाहीशी होत आली. गिधाडांची मानेचे स्नायू कमजोर झाल्याने त्यांची मान त्यांना सावरत येईना. त्याशिवाय अंडी कमजोर झाली. मादी ही अंडी उबविण्यास जेव्हा अंड्यावर बसायची तेव्हा ही अंडी फुटू लागली. यामुळे आज कोकणातून गिधाडे जवळपास नामशेष झाली.

आज जागतिकीकरणामुळे देशाने अनेक करारावर सह्या करून मंजुरी दिली आहे. याची सुरवात 30 वर्षांपूर्वी ग्याट आणि डंकेल करारानी झाली. जागतिक बँकेला हाताशी धरून अमेरिकीने आपणास फायदेशीर होणारे करार विकसनशील देशांवर लादले. त्यावेळेस अमेरिकेस आपला सर्व प्रकारचा व्यापार विकसनशील देशांवर लादायचा होता. अमेरिकेत/युरोपात बंदी असणारी कीटकनाशके भारतात विकली जात होती. तत्कालीन भारतीय सरकार ह्याकडे कीती निर्लज्जपणे पहात होती हे भोपाळ दुर्घटनेवरून सर्व जगाला कळले. आणि स्थानिक सरकारने कंपनीच्या मालकास परदेशी पळून जाण्यास मदत केली. अशा प्रकारे आत्तापर्यंत सरकारने शेतकऱ्यांकडे आणि ते पिकवत असलेल्या विषारी अन्नधान्याकडे इतपत दुर्लक्ष केले की आज भारतीय जनतेचा औषधांवरील खर्च बेसुमार वाढला. कीटकनाशके बनविणारी कंपनी-विकणारे व्यापारी-शेतकरी-उत्पन्न-ग्राहक यातील साखळी आज ह्या व्हिडिओने भेदली आहे. आज  सोशल मीडियामुळे ज्ञान एवढ्या वेगाने पसरत आहे की, पूर्वीच्या ह्या अघोरी पॉलिसिबाज लोकांना धडकी बसलीय हेच खरे.

पंजाबमध्ये तण काढायला मजूर नसल्याने किटकनाशकांचा बेसुमार वापर होऊन ती अन्नधान्यात उतरली आणि त्याचबरोबर माणसांच्या रक्तातही. फवारलेली कीटकनाशके पाण्यातून जमिनीत उतरून तेथील जलस्तोत्र विषारी बनले. आज अनेक विहिरींचे पाणी पिण्यालायक राहिले नाही. पंजाबमधून बिकानेरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये रोज 70-75 जण कॅन्सरचे पेशन्ट असतात की जे उपचारासाठी बिकानेरला जात असतात. आज उत्पादित होत असलेल्या अनेक भाजीपाला, धान्याला पूर्वीसारखी चव राहिलेली नाही. पूर्वी लसुनाला जो तिखटपणा आणि चव असायची ती आज जाणवत नाही. भाजीला चव यावी म्हणून मसाल्याचा वापर जास्त करावा लागतो.

आज ह्या अतिरेकीपणामुळे लोक सेंद्रिय धान्याकडे वळू लागलीत. हा बदल आता आशादायक आहे. सेंद्रिय खाद्यान्नाच्या जर वेगाने प्रसार झाला तर यापुढील पिढी नक्कीच बळकट जन्माला येईल आणि जग सुंदर होईल , असा मला विश्वास वाटतो. शिवाय रासायनिक पिकापेक्षा सेंद्रिय पिकाला दुप्पट भाव मिळतो. शेतकऱ्यानी आपल्या शेतीत नवीन तंत्राचा वापर करून जर आता शेती केली तर, शेतीवरील खर्च कमी तर होऊन धान्याचे प्रमाण वाढेल. त्याशिवाय जमिनीचा पोतही सुधारेल हे नक्की.

- विश्वनाथ सावंत 9769 264430

No comments: