Monday, July 16, 2018

एका ट्रिपची गोष्ट


8 जुलै 2018 च्या रविवारी भालचंद्र दादाच्या मुलुंडच्या घरी आमची एक मीटिंग झाली. गावासांबधी साधकबाधक चर्चा हाच ह्या मिटिंगचा उद्देश होता. येथे आमचे ठरले की ह्या पावसात इतर कुठल्याही रिसॉर्टवर न जाता गावी जायचे. पिकनिक मुडही सांभाळायचा आणि नदीची पाहणी करायची. ठरले तर, 13 तातखेस शुक्रवारी रात्री निघायचे. एकूण 12 जण तयार झाले. तत्काळ तिकीट काढायची जबाबदारी प्रकाश राणे आणि भाळचंद्र दादाने घेतली. दादाला कोकणकन्येच्या 4 तिकीट मिळाल्या आणि प्रकाशला मेंग्लोरच्या 4 कन्फर्म आणि 4 वेटिंग मिळाल्या.
शुक्रवार उजाडला आणि आम्हीं मेंग्लोरचे 8 पैकी 5 फंटर मी, गणेश, प्रकाश, संजीव आणि राजेश ठाणे स्टेशनवर आलो. आणि उर्वरीत 3 बबन, अजय आणि शरद सीएसटी वरून गाडीत बसून आले. पावसाचे दिवस असल्याने गाडी अर्धा तास उशिरा आली. सामानाची जमवाजमव झाली होतीच. एक अजून सिटची व्यवस्था झाली.गप्पा सुरु झाल्या. सगळ्या गप्पांचा विषय अर्थातच गाव होता. मागच्या वेळी काय चुका झाल्या आणि यापुढे कसे करावयाचे हाच आमच्या गप्पांचा विषय होता. रात्री 2 वाजता आम्ही सर्व झोपलो.

सकाळी कणकवली स्टेशनला मस्त नाष्टा झाला. मधुमेहासाठी मी 1 जुलैपासून नाष्टा बंद केला होता. पण भावांची पिकनिक म्हणजे तेथे नियम बाजूला ठेवणे आलेच. कणकवलीतुन आशिया मठात मंगेशभाऊंनी ऑफर केलेली 25 एकर जागा बघण्याचा कार्यक्रम होता. नाष्टा करेपर्यंत राजवाडीतून समीरला त्याची टमटम (सहा आसनी रिक्षा) घेऊन बोलावले. आणि आम्ही निघालो. जागा दाखविण्यासाठी मंगेशभाऊंचे भाऊ श्रीधरभाई आले होते. प्रचंड नारळाची बाग, सुपारी, 4 हजाराच्या आसपास काजू, आणि हापूस आंबा यांची बाग बघितली आणि कणकवलीला 4 किलो मटण घेऊन आम्ही नाटळकडे प्रस्थापित झालो.

बॅगा घरी ठेवून धबधब्याकडे निघालो. तोपर्यंत समीर, अवधूत, मया (महेंद्र), छोटा हसमुख रोहित आणि भालचंद्र हे मोठ्या घरातले आले होते. सचिन बाबू अगोदरच गावी पोचला होता. रिमझिम पाऊस सुरू होताच. रामेश्वराच्या प्रांगणातुन जाताना एकच आवाज घुमला *”रामेश्वर माऊली की जय”* धाकल्या मोहूळात जाताना समीरची टमटम पापडीवर (ब्रिज) आली आणि वरतून येणारे पाणी पापडीजवळ खूपच खळाळते असे दिसून आले. टमटम थांबली.  हेही एक लक्षात आले की, पुनर्जीवित नदी दिसली की सर्वानाच वेगळे समाधान वाटते. पापडीला वरून आलेले खूप ओंडके अडकून पाण्याचा प्रवाह कुंठित झाला होता. सर्वांनी ते ओंडके काढण्याचा प्रयत्न केला पण दोरी, पहारी, कोयता नसल्याने हे काम दुसऱ्या दिवशी रविवारी करण्याचे ठरवून आम्ही तेथून 11 वाजता मार्गस्थ झालो.

धाकटे मोहूळ जसजसं जवळ येत चालले तसतसं मुसळ्या धबधबा जवळ दिसायला लागला. अगदी वाऱ्याच्या झोताने हलताना कळत होता. अवर्णनीयच दृश्य होते. उजव्या हाताला शेतकरी पॉवर टीलरने शेत नांगरत होते. घेतलेले मटण संध्याकाळच्या कार्यक्रमाला बनविण्यासाठी समीरकडे द्यावयाचे होते. आणि एकाच्या लक्षात आले की नांगरणी करणारा समिरच आहे. त्याला बोलावले मग प्रमोदही आला. प्रमोद समीरचा चुलत भाऊ. प्रमोद आणि हुंमलेटेम्बच्या अनीलचे भाऊजी नदीकामात पूर्ण धाकले मोहूळ सोबत होते. मग एक सेल्फी झाला. रस्ता जेथे संपतो त्या दगडाच्या कापावर आमची टमटम ठेवून समोरच असलेल्या नागेश बोडेकराच्या घराकडे निघालो. नागेश एक प्रगतिशील शेतकरी आहे. कापावरूनच सह्याद्रीतले सर्व धबधबे दिसत होते. ह्या धबधब्यांचा राजा मुसळा बेभान वाहत होता. पायवाट विचारण्यासाठी नागेशला हाक मारली. नागेशने ओ दिली आणि पायवाट साफ करण्यासाठी कोयता घेऊन सोबत आला. तिथे एक छोटे काळे-पांढरे कुत्र्याचे पिलू होते. त्याच्याबरोबर मस्ती केल्यानन्तर तेही आमची पाठराखण करत आले. धबधब्यावर जाताना “गणगो (गणेश) पोखरणकार ह्या पायवाटेने कसो येतलो” हा एक प्रश्न होता. निसरड्या पायवाटेने आम्ही 20 मिनिटे न डगमगता धबधब्यावर आलो. धबधबा पाहून समस्त भाऊ खुश झाले. गेल्याच वर्षी ह्या धबधब्यावर मी आलो होतो.

धबधब्याचा सर्व प्रकारचा आनंद घेत असताना मी त्यांना सांगितले की ओणवे राहून हे पाणी पाठीवर घ्या. पन्नाशी पार झालेल्या ह्या वयात हा थ्रिलिंग वॉटर मसाज सर्वानाच भावला. दीड तास झाला. भूक लागली आणि आमची पावले पुन्हा घराकडे वळली ती हा निर्धार करून की, *ह्या रॉयल धबधब्याकडे जाणारी वाट जाण्यायोग्य करायची.

पुन्हा पापडीजवळ आल्यानंतर बबनने अडकलेली झाडे काढण्याचा विचार बोलून दाखविला. आणि आमच्या अध्यक्षांच्या बोलण्याला मान देऊन सर्व खाली उतरले. सहा-सात खाली पाण्यात उतरले आणि बबन दोरी पहार आणायला देवळात गेला. इतक्यात अभिषण आणि वहिनी बाईकवरून घराकडे जाताना आम्हाला बघून थांबले. मला ह्या कामात एकतरी गाववाल्याचा हात हवा होता. आणि योग्य माणूसच समोर आला होता. मग तोही रेनकोट काढून उतरला. आणि सर्वांच्या प्रयत्नाने आणि रामेश्वर माऊलीच्या आशीर्वादाने सगळे ओंडके बाहेर काढले. त्यानंतर पळसल्याच्या पापडीला अडकले ओंडके काढले. अभि तेथेही आला. येथे मात्र आमच्या दोघांचे चष्मे काम करताना नदीत वाहून गेले.

हे काम करीत असता गावातल्या काही जुन्या माणसांनी आवर्जून सांगितले की पाऊस लागल्यापासून दोनदा हूर (पूर) आले. जर तुम्ही हे काम केले नसते तर पाणी नदीबाहेरील जागेत घुसून शेताचे नुकसान झाले असते. काल कोकणभूमीच्या कार्यक्रमास जाताना शरद आणि बबनचा फोन आला की पुन्हा मोठा हूर आला. गावाच्या उपयोगास आपण आलो याहून मोठे समाधान नाही. काल कार्यक्रमात कर्नाटकातून आलेल्या स्वामींनी आध्यत्मिक भक्ती आणि प्राकृतिक भक्तीची मांडणी केली. नियंत्याने प्रकृती निर्माण केली. त्यातील आप, वायू, पृथ्वी, आकाश, तेज ह्या पंचमहाभूतांनी आपले शरीर तयार झालेले आहे. यातील आप म्हणजे जल याची आपण सेवा केली, ही एक बाह्य भक्तीच आहे. ज्यावेळी आपण देवासमोर गाऱ्हाणे घालतो ती आंतरीक भक्ती. स्वामींचे म्हणणे पटण्यासारखेच होते.

काम करून तुषारकडे गेलो तर डुकराचे मटण जेवताना खाण्यास मिळाले. वा वा! गावी आल्यानंतर असे काही मिळाले की 4 घास अधिक जातात. जेवणानंतर चर्चा करत असताना भालचंद्र दादाने ह्या धबधब्याचे *”रॉयल धबधबा”* असे केले.
संध्याकाळी पुन्हा 7 वाजता फंटर तयार झाले आनI रविभाईंच्या धाकल्या मोहूळातील फार्म हाऊसवर पुन्हा निघालो. गप्पाटप्पा सुरू झाल्या. तयार झालेलं जेवण कुणकेरकार बंधूनी आणून दिले आणि तेही सहभागी झाले. *चर्चेचा विषय एकच शेती आणि फळफळावळ.*

दुसऱ्या दिवशी पुन्हा नदीवर फेरफटका करण्यास मंडळी निघाली. शरद आनंदाने सांगत होता, “नदिर लावलेली झाडा सगळी जगली.” आम्हाला आता झाडे बघण्याची उत्सुकता लागली. चौपाटीवरील सर्व झाडे जगली होती. आणि मला विश्वास आहे की किनाऱ्यावर लावलेली सर्व झाडे चांगली भर मिळाल्याने जगणार. नदीवर फोटोसेशन करून आम्ही घरी आलो आणि संध्याकाळच्या राजवाडीने कणकवलीस निघालो. अशातर्हेनें गावच्या सहलीची आणि नदी पाहणीची सांगता झाली.

- विश्वनाथ मनोहर सावंत

Saturday, July 7, 2018

कीटकनाशके आणि सेंद्रिय शेती




कीटकनाशके आणि सेंद्रिय शेती

एकही खर्च न करता, 4000 शेतकऱ्यानी पिकावर येणारी कीड 5 प्रकारच्या वनस्पतींचा वापर करून घालवली. हा व्हिडीओ पाहिला. हा व्हिडीओ पहाताना दोन वाक्यप्रचार आठवले. तुझं आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी. आणि लोहा लोहेको काटता है।

निसर्गाने सर्व काही आपणास दिले आहे परंतु मल्टिनॅशनल कंपन्यांनी चुकीची दिशा सर्व बाबतीत आपणास दाखवली. आणि आतापर्यंतच्या सरकारने त्याला मान डोलावली... पैशाचा पाऊस जो पडत होता. अनेक कीटकनाशके जी युरोपियन देशात बँड होती ती आपल्याकडे सर्रास विकली जात होती. ही कीटकनाशके फवारल्याने पिकामधून ही आमच्या आणि जनावरांच्या पोटात गेली. ही मेलेली जनावरे खाऊन गिधाडे नाहीशी होत आली. गिधाडांची मानेचे स्नायू कमजोर झाल्याने त्यांची मान त्यांना सावरत येईना. त्याशिवाय अंडी कमजोर झाली. मादी ही अंडी उबविण्यास जेव्हा अंड्यावर बसायची तेव्हा ही अंडी फुटू लागली. यामुळे आज कोकणातून गिधाडे जवळपास नामशेष झाली.

आज जागतिकीकरणामुळे देशाने अनेक करारावर सह्या करून मंजुरी दिली आहे. याची सुरवात 30 वर्षांपूर्वी ग्याट आणि डंकेल करारानी झाली. जागतिक बँकेला हाताशी धरून अमेरिकीने आपणास फायदेशीर होणारे करार विकसनशील देशांवर लादले. त्यावेळेस अमेरिकेस आपला सर्व प्रकारचा व्यापार विकसनशील देशांवर लादायचा होता. अमेरिकेत/युरोपात बंदी असणारी कीटकनाशके भारतात विकली जात होती. तत्कालीन भारतीय सरकार ह्याकडे कीती निर्लज्जपणे पहात होती हे भोपाळ दुर्घटनेवरून सर्व जगाला कळले. आणि स्थानिक सरकारने कंपनीच्या मालकास परदेशी पळून जाण्यास मदत केली. अशा प्रकारे आत्तापर्यंत सरकारने शेतकऱ्यांकडे आणि ते पिकवत असलेल्या विषारी अन्नधान्याकडे इतपत दुर्लक्ष केले की आज भारतीय जनतेचा औषधांवरील खर्च बेसुमार वाढला. कीटकनाशके बनविणारी कंपनी-विकणारे व्यापारी-शेतकरी-उत्पन्न-ग्राहक यातील साखळी आज ह्या व्हिडिओने भेदली आहे. आज  सोशल मीडियामुळे ज्ञान एवढ्या वेगाने पसरत आहे की, पूर्वीच्या ह्या अघोरी पॉलिसिबाज लोकांना धडकी बसलीय हेच खरे.

पंजाबमध्ये तण काढायला मजूर नसल्याने किटकनाशकांचा बेसुमार वापर होऊन ती अन्नधान्यात उतरली आणि त्याचबरोबर माणसांच्या रक्तातही. फवारलेली कीटकनाशके पाण्यातून जमिनीत उतरून तेथील जलस्तोत्र विषारी बनले. आज अनेक विहिरींचे पाणी पिण्यालायक राहिले नाही. पंजाबमधून बिकानेरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये रोज 70-75 जण कॅन्सरचे पेशन्ट असतात की जे उपचारासाठी बिकानेरला जात असतात. आज उत्पादित होत असलेल्या अनेक भाजीपाला, धान्याला पूर्वीसारखी चव राहिलेली नाही. पूर्वी लसुनाला जो तिखटपणा आणि चव असायची ती आज जाणवत नाही. भाजीला चव यावी म्हणून मसाल्याचा वापर जास्त करावा लागतो.

आज ह्या अतिरेकीपणामुळे लोक सेंद्रिय धान्याकडे वळू लागलीत. हा बदल आता आशादायक आहे. सेंद्रिय खाद्यान्नाच्या जर वेगाने प्रसार झाला तर यापुढील पिढी नक्कीच बळकट जन्माला येईल आणि जग सुंदर होईल , असा मला विश्वास वाटतो. शिवाय रासायनिक पिकापेक्षा सेंद्रिय पिकाला दुप्पट भाव मिळतो. शेतकऱ्यानी आपल्या शेतीत नवीन तंत्राचा वापर करून जर आता शेती केली तर, शेतीवरील खर्च कमी तर होऊन धान्याचे प्रमाण वाढेल. त्याशिवाय जमिनीचा पोतही सुधारेल हे नक्की.

- विश्वनाथ सावंत 9769 264430