Tuesday, August 7, 2018

परवा 6 तारखेला आमचा जाड्या गेला. सकाळी 4.30 वाजता मनालीचा फोन गौरंगला आला. तो कायमचा गेला यावर विश्वासच बसत नव्हता. 10 मिनिटे अंथरूणातच बसलो. माझा फोन सूरु केला आणि घाग भावोजींचा फोन आला. मनात एक आले की, संदीपलाच फोन करावा आणि खात्री करून घ्यावी. 5 वाजता टेकडीवर पोचलो. जाड्याकडे बघताना तो गेलाय हे जाणवतच नव्हते. साऊने केलेल्या विनवणीकडे, “बाबांना उठवा, गावी जायचंय त्यांना” माझ्याकडे उत्तर नव्हते. त्याच्याजवळ बसताना आता नाटळला मे महिन्यात आला होता त्या आठवणी मनात येत होत्या. मी गावी नदीच्या कामासाठी होतो आणि जाड्याचा फोन आला, “अंजनवेलला गोंधळासाठी गावी येतोय, तुपन ये.” मी म्हटले, “येतो पण एका अटीवर, माझ्याबरोबर तुपन नाटळला ये.” आणि जाड्या तयार झाला. कामाची व्यवस्था लावून मी अंजनवेलला निघालो. त्याच दिवशी गोंधळ होता. गोंधळ आटपून दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे निघालो, नाटळच्या दिशेने. जुन्या आठवणी जागवत, गाणी म्हणत, भेंड्या खेळत आमचा प्रवास संपला. आणि हे सगळे क्षण जाड्या एन्जॉय करत होता. मला कल्पनाही नव्हती की हा भडवा 3 महिन्यात कायमच्या प्रवासाला जाणार. गावी दोन दिवस होता. नदीवर यायचा. माझ्या गावातील भावांशी गप्पा मारायचा. चालताना त्याला त्रास व्हायचा, अडखळायला व्हायचे. नदीवरच मिळालेली पांढऱ्या ऐनाची फांदी तो टेकायला वापरायचा. दोन दिवस छान गप्पा मारल्या, जुन्या आठवणीत रमलो. पण यावेळचा संदीप थोडा चिंतनशील आणि गंभीर वाटला. मध्ये मध्ये आमचा अवखळ जाड्या दिसत होता. आणि मुख्य म्हणजे ठाण्याला परतण्याची घाई नव्हती. पण तिसऱ्या दिवशी मला म्हणाला निघतो मी. त्याला कणकवलीला ठाण्याच्या बसमध्ये बसवले आणि मी पुन्हा गावी परतलो. मी पुन्हा ठाण्याला आल्यावर फोन व्हायचे पण भेट नाही झाली. मेसेज आमचे एकमेकांना यायचेच. संदीप गेल्यानंतर त्याच्या बिल्डिंगच्या जिन्यावर बसून त्याने पाठवलेले मेसेज चाळले. सेकंडलास्ट मेसेज मनाला व्याकुळ करून गेला. तो तुमच्यापैकी काहीजणांना आला असेलच. “घर” सिनेमातील लता-किशोरच्या गाणाबद्दल होता. आज 8 ऑगस्ट, दादा कोंडकेंचा वाढदिवस आणि त्यांच्यावर चित्रित केलेले “जिवा शिवाची बैल जोडssss” गाणं आठवलं. संदीप हे गाणे समरसून गायचा. ह्या गाण्याशी त्याच्या काही आठवणी जोडल्या होत्या. त्यातील एक म्हणजे तरुणपणी, लग्नाच्याही अगोदर, बिल्डिंगच्या सत्यनारायणाच्या पूजेच्यावेळी ऑर्केस्ट्रात हे गाणे गायल्यानंतर त्याला बक्षीस मिळाले होते. आणि वंसमोअर देखील. तो इतरही गाणी छान गायचा पण पिकनिकला हे गाणे ठरलेलंच असायचे. असाही तो आमच्या मनातून जायचा नाही, पण ज्या ज्या वेळी हे गाणे वाजेल तेव्हा डोळे नक्कीच पाझरतील. -बंड्या सावंत 8.8.18